Kinwat SDO Office Protest
किनवट : शेतकरी, शेतमजूर, कामगार, योजना कर्मचारी तसेच आदिवासी व वंचित घटकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी (दि. १०) उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. किसान सभेचे नेते कॉ. अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
हुतात्मा गोंडाराजे मैदान येथून आंदोलनाला सुरुवात झाली. मुख्य मार्गावरून रॅली काढत आंदोलक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचले. याठिकाणी विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांवर चर्चा केली. संबंधित विभागांकडे मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. स्थानिक प्रश्नांबाबत लेखी आश्वासनही मिळाल्याचे किसान सभेने सांगितले.
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यासह थकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची कायदेशीर तरतूद करावी, पीकविम्याची थकीत रक्कम तातडीने द्यावी, सिंचन तलावांची निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली.
वन, गायरान व देवस्थान जमिनीवरील पात्र शेतकरी आणि शेतमजुरांना मालकी हक्क देणे, रोजगार हमी योजनेंतर्गत पुरेसे काम उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज देणे तसेच योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करणे, या मागण्याही निवेदनात करण्यात आल्या.
याशिवाय स्मार्ट मीटर रद्द करणे, चार श्रमसंहिता रद्द करणे, भारत-अमेरिका व्यापारी करार रद्द करणे, आदिवासी व वंचित घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे तसेच किनवट जिल्हा निर्मिती करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या सभेत कॉ. अर्जुन आडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. सरकार श्रमिकविरोधी धोरणे राबवत असून शेतकरी, कामगार आणि श्रमिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रश्नांवर आगामी काळात संघर्ष अधिक तीव्र करण्याचे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले.
या आंदोलनात जनार्दन काळे, शेषराव ढोले, शैलीया आडे, सुनिता बोनगीर, आडेलू बोनगीर, इरफान पठाण, सीताराम आडे, अंबर चव्हाण, तानाजी राठोड, मोहन जाधव, मनोज सल्लावार, इंदल राठोड, शेख फरीद बाबा, शेख चांद, नंदू मधुकर, इंदुताई डोंगरे, शिवाजी किरवले, विजय जाधव, रंगराव चव्हाण, सुदाम बर्गे, प्रशांत जाधव, साईनाथ राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कामगार सहभागी झाले होते.