महिलांनी आपल्या विविध मूलभूत प्रश्नांसाठी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. Pudhari
नांदेड

Nanded Protest | महिला दिनी महिलांचे आंदोलन; दारू-मटका बंदी, १२ तास वीज व वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे विविध मूलभूत प्रश्नांसाठी महिलांचे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Kinwat Taluka Islapur Women Protest

किनवट : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जनवादी महिला संघटना व किसान सभेच्या वतीने तालुक्यातील इस्लापूर येथे महिलांनी आपल्या विविध मूलभूत प्रश्नांसाठी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. दारू-मटका बंदी, शेतीसाठी १२ तास अखंडित वीजपुरवठा तसेच वन्यप्राण्यांच्या वाढत्या त्रासावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागण्यांसाठी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

कॉ. अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात महिलांनी “फुले नकोत, सन्मानाने जगू द्या”, “दारू-मटका बंद करा”, “१२ तास वीज द्या”, “वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा” अशा घोषणा देत परिसरातील ज्वलंत प्रश्न मांडले. आंदोलनानंतर महिलांनी पोलीस प्रशासन, महावितरण आणि वन विभागाला निवेदन देऊन विविध मागण्या सादर केल्या.

निवेदनात परिसरातील अवैध दारू व मटका अड्ड्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. शेतीसाठी वीजेची अत्यंत गरज असताना अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी व महिलांचे कष्ट वाढत असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे किमान १२ तास अखंडित वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता त्रास थांबवून शेतपिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. धानोरा येथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये तर जखमींना २० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, तसेच जंगलालगत असलेल्या शेतजमिनींना मोफत कुंपण करून संरक्षण द्यावे, अशी मागणी महिलांनी केली.

महिला संघटनेच्या नेत्या शेवंताबाई आडे यांनी सांगितले की, महिला दिनानिमित्त फुले देऊन सन्मान करण्यापेक्षा महिलांच्या जगण्यातील मूलभूत समस्या सोडविणे हीच खरी भेट ठरेल. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात सुनीता बोनगीर, शिला ठाकूर, इंदुबाई डोंगरे, गयाबाई बरगे, सुरेखा मेंढके, शिलाबाई जाधव, धुरपताबाई डुकरे यांच्यासह परिसरातील शेकडो महिला व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT