Kinwat Illegal Liquor Seizure
किनवट : तालुक्यातील डोंगरगाव येथे हातभट्टीच्या अवैध धंद्यावर पोलिसांनी शनिवारी (दि.14) सकाळी धडक कारवाई करत सुमारे ६०० लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायनयुक्त मोहफूल व मद्य गाळण्याचे साहित्य जप्त केले.
या कारवाईत सुमारे 36 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन किनवट येथे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही मासरेड कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या आदेशानुसार तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील आरोपी मोतीराम नागोराव हुरदुके यांच्या शेतात धाड टाकण्यात आली. तपासादरम्यान तेथे मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी साठवलेले मोहफूल व मद्यनिर्मितीचे साहित्य आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ दारू गाळण्याचे साहित्य नष्ट केले असून मोतीराम नागोराव हुरदुके यांच्याविरुद्ध किनवट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस हेडकॉन्स्टेबल आत्राम, सिद्धार्थ वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल रांजणे, महिला कॉन्स्टेबल मंजू पवार यांनी सहभाग घेतला. पुढील तपास बीट जमादार सिद्धार्थ वाघमारे करीत आहेत.