माळाकोळी, पुढारी वृत्तसेवा : माळाकोळीपासून जवळच असलेल्या खेडकरवाडी (ता. लोहा) येथे ट्रक व दुचाकी च्या अपघातात खेडकरवाडीचे उमाजी विठ्ठल खेडकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक मुलगा संभाजी खेडकर गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.२२) दुपारी १२ च्या सुमारास घडली. (Nanded Accident)
याबाबत अधिक माहिती अशी की, मुलगा संभाजी खेडकर व वडील उमाजी खेडकर हे खेडकरवाडीहून लोहाकडे दुचाकीवरून (एम एच २६ सीडी ३६६२) जात होते. यावेळी भरधाव ट्रकने (एम पी २० झेड टी ६२८५) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात वडील उमाजी खेडकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा संभाजी खेडकर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच माळाकोळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. मृत उमाजी खेडकर हे खेडकरवाडीच्या उपसरपंच शिवगंगाबाई खेडकर यांचे पती होत.