Nanded Kandhar bus cancellation
फुलवळ: कंधार आगाराची 'मानव विकास' बस आज (दि. 14) सकाळी नियोजित मार्गावरील अंतिम टप्पा पूर्ण न करताच अर्ध्या वाटेतून परतल्याने पानशेवडी कंधारेवाडी येथील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.
एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ही बस पानशेवडी पर्यंत धावत असल्याची माहिती दिली. मात्र, प्रत्यक्ष पाहणीनुसार, ही बस फुलवळ येथील महादेव मंदिरापासूनच मागे फिरली. परिणामी, कंधारेवाडी येथे बसची वाट पाहत असलेले शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी तिथेच ताटकळत राहिले.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना १२वी पर्यंत मोफत वाहतूक सुविधा मिळावी, म्हणून 'मानव विकास' योजने अंतर्गत ही बस सेवा चालवली जाते. या बसवर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासाची सुविधा न मिळाल्याने त्यांना नाईलाजाने घरचा रस्ता धरावा लागला. विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहता, एसटी महामंडळाने या अनियमिततेची तातडीने चौकशी करून बस वेळेवर आणि पूर्ण मार्गावर धावेल याची दक्षता घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.