nanded illegal teak tree felling forest security  
नांदेड

Nanded|वनचौकीसमोरच सागवान झाडांची कत्तल; वनसंपत्तीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

nanded illegal teak tree felling forest security | अकरा दिवसांपासून प्राथमिक गुन्ह्याची माहिती देण्यास टाळाटाळ; अधिकृत तोडीचा बनाव करून अवैध वृक्षतोड दडपण्याचा प्रकार!

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड - उमरखेड वनपरिक्षेत्रातील तरोडा बीटमध्ये वनचौकीपासून हाकेच्या अंतरावर तब्बल १६ सागवान झाडांची अवैध कत्तल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, २४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले असताना, घटनेला अकरा दिवस उलटूनही वनविभागाकडून प्राथमिक गुन्ह्याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने या प्रकरणात नेमके काय दडविले जात आहे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

उमरखेड-पुसद रोडवरील गंगणमाळ फाट्याजवळ असलेल्या वनविभागाच्या चौकीसमोरच १६ सागवान झाडांची कत्तल झाली. त्या रात्रीच्या वेळी वनविभागाचा एकही कर्मचारी, वनरक्षक अथवा वनपाल घटनास्थळी हजर नसल्याचे म्हटले जात आहे. कत्तल केलेली सागवानाची झाडे तेथून तोडून नेण्यात आली.

घटनास्थळी केवळ मोठ्या फांद्या, पालापाचोळा आणि छोट्या फांद्या शिल्लक ठेवण्यात आल्या. उर्वरित लाकूड चारचाकी वाहनातून नेण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटना घडल्यानंतर वनविभागाला माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पाहणी करून वृक्षतोड झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही वृक्षतोड अधिकृत होती की अवैध, याबाबतचा प्राथमिक गुन्हा नेमका कधी नोंदविण्यात आला आणि कोणाविरुद्ध नोंदविण्यात आला, याची माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही.

विशेष म्हणजे, घटनास्थळी कापण्यात आलेल्या सागवानाच्या बुंध्यांवर कूप क्रमांक, लॉट ०४/२०२६ तसेच झाड क्रमांक १ ते १६ वर अधिकृत हातोडा क्रमांक ११९ पीएसएमडी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा सागवान अधिकृत तोडीसाठी चिन्हांकित करण्यात आला होता की अवैध वृक्षतोडीनंतर अधिकृत तोडीचा आभास निर्माण करण्यासाठी मार्किंगचा वापर करण्यात आला, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे.

जर ही वृक्षतोड अधिकृत असेल तर त्यासाठी संबंधित आदेश, परवानगी, तोडीचे कारण, कूप क्रमांक, लॉट क्रमांक, झाडांची संख्या आणि तोडीनंतरच्या लाकडाची वाहतूक यासंबंधीची कागदपत्रे वनविभागाने सार्वजनिक करणे अपेक्षित आहे. आणि जर वृक्षतोड अवैध असेल तर घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनगुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणे अपेक्षित होते. मात्र,यटनेला अकरा दिवस उलटूनही प्राथमिक गुन्ह्याची माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने वनविभाग नेमकी कोणाची पाठराखण करीत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

सामान्य नागरिकाने जंगलातील एखाद्या झाडाची फांदी तोडली तरी त्याच्यावर वनकायद्यानुसार कारवाई केली जाते. मग, वनचौकीसमोरच १६ सागवान झाडांची कत्तल होऊनही प्राथमिक गुन्ह्याची माहिती वेळेत का देण्यात आली नाही? कत्तल झालेली झाडे अधिकृत होती की अवैध, याची खातरजमा तत्काळ का झाली नाही? बुंध्यांवरील अधिकृत हातोडा मार्किंग नेमके कोणत्या आदेशानुसार करण्यात आले? तोडीसाठी अधिकृत परवानगी होती तर कापलेले लाकूड कुठे नेण्यात आले? त्याची वाहतूक कोणत्या वाहनातून झाली? या सर्व गोष्टी अनुत्तरित आहेत.

या घटनेमुळे वनपरिक्षेत्र उमरखेडमध्ये वनचौकीसमोरच एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवानाची कत्तल होत आहे. त्यामुळे दुर्गम जंगलातील वनसंपत्तीच्या सुरक्षेचा प्रश्ने ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची केवळ स्थानिक पातळीवर चौकशी न करता मुख्य वनसंरक्षक, यवतमाळ यांनी सखोल चौकशी करावी. कूप क्रमांक व लॉट क्रमांकाच्या नोंदी, अधिकृत मार्किंगचे आदेश, तोडीची परवानगी, घटनास्थळाचा पंचनामा, लाकूड वाहतुकीची कागदपत्रे तसेच प्राथमिक वनगुन्ह्याची नोंद यांची पडताळणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT