नांदेड

Nanded Hospital News : शासकीय रुग्णालयाचे मूळ दुखणे अद्याप उपचाराविना

दिनेश चोरगे

नांदेड : नांदेड आणि इतर ठिकाणच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांतील रुग्णमृत्यूंचे प्रकरण आठवडाभर गाजल्यानंतर या रुग्णालयांच्या मूळ दुखण्यावर उपचार करण्याच्या बाबतीत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर वरील बाब स्पष्ट झाली.

येथील शासकीय रुग्णालयात २७ सप्टेंबरनंतर शंभराहून अधिक रुग्णांचा झालेला मृत्यू राज्यभर गाजल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह या विभागाचे प्रमुख अधिकारी भेट देऊन गेले. विरोधी पक्षनेत्यांचा दौरा झाला. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी येथील स्थितीचा आढावा मागील आठवड्यातही घेतला होता. पण वरील रुग्णालयातील वाढीव ५८० रुग्णखाटांच्या व्यवस्थेला मान्यता देऊन त्याप्रमाणात इतर व्यवस्था करण्याची मागणी फार पुढे सरकलेली नाही, असे सांगण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या राज्यातील बहुतांश रुग्णालयांच्या प्रशासनाला वाढीव रुग्णसंख्येचा सामना अत्यंत तुटपुंज्या व्यवस्थांमध्ये करावा लागत आहे. वर्षभरापूर्वी सर्व महाविद्यालयांच्या अधिष्ठातांकडून वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रस्ताव मागविले होते, पण त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे संबंधित मंत्र्यांच्या कार्यालयातून समजले.
नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी ५०० रुग्णखाटांच्या प्रमाणात मनुष्यबळ व इतर बाबी मंजूर आहेत. पण या रुग्णालयात मागील काही वर्षात दुपटीहून जास्त खाटा वाढल्या, तरी त्याच्या प्रमाणात मनुष्यबळ औषधी पुरवठा आणि साधनसामग्री नाही. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही अशीच स्थिती आहे.

नांदेडच्या मृत्यू प्रकरणांतील कारुण्य तीव्रपणे समोर आले. त्याची चौकशी झाली. त्यानंतर शासनाने कोणाला 'बळीचा बकरा' केले नसले, तरी अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामग्रीनिशी रुग्णसेवा देणार्या डॉक्टरांनी मूळ दुखण्यावर ताबडतोब उपाय करण्याची मागणी गेल्या आठवड्यात केली होती, पण मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या तातडीच्या गरजा गतिमानतेने मार्गी लावण्याऐवजी जुन्या रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या विषयाला प्राधान्य दिले. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील दैना कायम आहे
विविध राजकीय नेते शासनावर खापर फोडत असले, तरी शासन मूळ दुखण्यावर उपचार करण्याच्या बाबतीत गतिमान नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे…

सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे नांदेडहून सहभागी झाले होते. नांदेडचेच भूमिपुत्र असलेले वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे प्रत्यक्ष बैठकीत हजर होते. सायंकाळी ही बैठक संपल्यानंतर डॉ. वाकोडे यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही स्वरूपाची थेट घोषणा झालेली नसली, तरी वाढीव रुग्णखाटांना मान्यता आणि त्या प्रमाणात मनुष्यबळ व साधनसामग्री इ. बाबी लवकरच मार्गी लागतील, अशी अपेक्षा डॉ. वाकोडे यांनी व्यक्त केली

SCROLL FOR NEXT