नांदेड

Nanded Hospital News : शासकीय रुग्णालय, छे… छे…. ही तर छळछावणी!

दिनेश चोरगे

नांदेड : २४ तासात २४ रुग्णांच्या मृत्युनंतर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय व वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णसेवेचा प्रचंड ताण, तोकडी व्यवस्था, अनागोंदी याचे विदारक चित्र उघड झाले. अतिदक्षता विभाग, प्रसुती विभाग, पुरूष व महिला विभागात क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने रुग्ण उपचार घेत आहेत. येथे तज्ज्ञ डॉक्टरांसह शिकाऊ डॉक्टरांची संख्या पुरेशी असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत असला तरीही एका डॉक्टरवर १५-२० रुग्णांची जबाबदारी असल्याचे वास्तव आहे.

या रुग्णालयात नांदेड जिल्ह्यासह परिसरातील १०-१२ जिल्ह्याच्या विविध भागातील बाह्यरुग्ण विभागात १५०० ते १६०० च्या आसपास रुग्ण येतात. केस पेपर काढण्यापासून ते डॉक्टरकडे क्रमांक लागेपर्यंत एक एका रुग्णाला तीन ते चार तासांचा अवधी लागतो. डॉक्टर उपस्थित न राहिल्यास रुग्णांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागते. बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून रुग्णालयात दाखल करून घेतले जात नसल्याचा आरोपही होत असतो. या रुग्णालयात जनरल २२ वार्ड, इमर्जन्सी ३ प्रसुती कक्ष दोन आणि अन्य एक असे एकूण २८ वार्ड असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. गणेश मनूरकर यांनी दिली.

  • प्रसुती कक्षात १५ बेड आहेत. तर रुग्णांची संख्या ४० च्या आसपास असून या ठिकाणी प्रसुतीपूर्वी आणि प्रसुतीपश्च असे ६० रुग्ण असतात. येथेही अनेक गरोदर स्त्रिया बेडसाठी वेटिंगवर असतात. येथे आलेल्या गरोदर मातांपैकी ७० टक्के नॉर्मल प्रसुती होतात तर ३० टक्के सिझेरियन होतात. साथ रोगाच्या उपचारासाठी ३० बेड आहेत. परंतु पावसाळ्यात किंवा एखादी साथ रोग पसरल्यास रुग्णांची संख्या ५० च्या आसपास असते. त्यामुळे वैद्यकीय सुविधा त्वरित दिल्या जातात

गेल्या २४ तासात ११८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन नवजात बालक व चार प्रौढ रुग्णांचा समावेश आहे. या काळात २९ रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रीया तर १० रुग्णांवर लहान शस्त्रक्रीया करण्यात आल्या. २६ महिलांची प्रसुती झाली असून यामध्ये १२ सिझर तर १४ नॉर्मल प्रसुती झाल्या आहेत.
डॉ. गणेश मनूरकर वैद्यकीय अधिकारी

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची ५०८ बेडची क्षमता आहे. यामध्ये रुग्णालय प्रशासनाने आणखी ५०० बेडची व्यवस्था केली आहे. मात्र या रुग्णालयात दररोज १५०० पेक्षा अधिक रुग्ण दाखल होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

SCROLL FOR NEXT