वाई बाजार : एकामागोमाग जात असलेल्या दोन दुचाकींना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार तर चारजण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील पालाईगुडा फाट्यावर शनिवारी (दि.१७) दुपारी १२ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे गोंडवडसा गावावर तीव्र शोककळा पसरली आहे.
गोंडवडसा येथील गजानन शंकर आशेवाड (वय ३५), कुंदन किशोर बावणे (वय ३०) आणि अतुल रमेश बावणे (वय २०) हे तिघे मोटरसायकल (क्रमांक: MH 26 BR 9154) या मोटरसायकलवरून सारखणी येथून पालाईगुडा फाटामार्गे गोंडवडसाकडे जात होते. त्याचवेळी त्यांच्या पुढे-मागे दराटी (ता. किनवट) येथील दोघांची मोटरसायकल (क्रमांक MH 29 AQ 9140) जात होती.
पालाईगुडा फाट्याजवळ मागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने गोंडवडसा येथील मोटरसायकलला जोरदार धडक दिली. ही मोटरसायकल पुढे जात असलेल्या दुसऱ्या मोटरसायकलवर जाऊन आदळली. या भीषण धडकेत दोन्ही मोटरसायकलवरील पाचही जण रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक चारचाकी गाडीसह पसार झाला.
स्थानिक नागरिकांनी तात्काळ सिंदखेड पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. गजानन आशेवाड यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी आदिलाबाद आणि यवतमाळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस फरार अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेत आहेत.