हिमायतनगर : येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही येथील आरोग्य सुविधांची अवस्था जैसे थे राहिली आहे. रुग्णालयात कर्मचारी वर्ग अपुरा आहे, तर लाखो रुपयांच्या अनेक मशीनरी उपलब्ध असूनही त्या धूळ खात पडून आहेत. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या नव्या इमारतीचे काम पूर्ण होऊनही ती अद्याप रुग्णालयाच्या ताब्यात देण्यात आलेली नाही, त्यामुळे ती वापराशिवाय पडून आहे. एका बाजूला रुग्णांसाठी जागा अपुरी असताना, दुसरीकडे भव्य इमारत धूळ खात ठेवण्यामागील कारण काय, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून सुविधा दिल्या असल्या तरी, जिल्हा चिकित्सक तसेच स्थानिक जबाबदार अधिकाऱ्यांच्या अकर्तव्येनिष्ठ कारभारामुळे या रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील गरीब रुग्ण उपचारासाठी येथे येतात, परंतु त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. अपुऱ्या स्टाफमुळे (१२ पैकी केवळ ४ सिस्टर कार्यरत) आणि कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
लाखो रुपयांच्या मशीनरी धूळखात
सर्वात गंभीर बाब म्हणजे, या रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीसाठी लागणाऱ्या डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, आणि ईसीजी यंत्रासारख्या लाखो रुपयांच्या मशीनरी उपलब्ध आहेत. मात्र, त्यापैकी डिजिटल एक्स-रे मशीन अजूनही उघडलेली नाही, तर ईसीजी मशीन हाताळण्यासाठी अधिकारी वेळेत उपलब्ध नसल्याने तीदेखील बंद आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना एक्स-रे, ईसीजी, सोनोग्राफीसाठी 'उपलब्ध नाही' असे सांगून परत पाठवले जात आहे. अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे सुविधा असूनही रुग्णांना त्यांचा फायदा मिळत नाहीये.
कोट्यवधीची इमारत पडून, कामाचा दर्जा निकृष्ट
जुनी इमारत अपुरी पडत असताना याच जागेवर सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून एक नवीन भव्य इमारत उभारण्यात आली. नांदेड आणि हिमायतनगर येथील कंत्राटदारांनी हे काम केले असले तरी, ते अर्धवट अवस्थेत असल्याचा आरोप आहे. इमारतीत लिफ्ट बसवलेली नाही आणि पावसाळ्यात इमारत संपूर्ण गळू लागल्याची माहिती मिळत आहे. इमारत पूर्ण होऊनही ती रुग्णालयाच्या ताब्यात का दिली गेली नाही, यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रुग्णांचा संताप, तातडीने उपाययोजनांची मागणी
ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतरही कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय स्टाफ वाढवण्यात आला नाही. तपासणीच्या मशीनरी बंद असल्यामुळे केवळ औषधोपचार (मेडिसिन) देऊन रुग्णांची तपासणी केली जात आहे. यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये आरोग्य प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हा चिकित्सक यांनी भेट देऊनही आरोग्य व्यवस्थेत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन; अपुऱ्या स्टाफची भरती करावी, बंद पडलेल्या मशीनरी त्वरित सुरू कराव्यात, नवीन इमारत त्वरित रुग्णालयाच्या ताब्यात देऊन ती उपचारासाठी खुली करावी, निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी, अशा मागणी जोर धरू लागली आहे.