Himayatnagar Drought
हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील आदिवासीबहुल पिचोंडी गावातील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर केरबा कोळेकर (वय ३५) यांनी शेतीतील उत्पन्नात घट झाल्याच्या विवंचनेतून गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पिचोंडी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
ज्ञानेश्वर कोळेकर हे वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत पेरणी करून तसेच इतरांची जमीन कसून शेतीच्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र, यावर्षी पावसाने ओढ दिल्याने आणि कोरड्या दुष्काळाच्या संकटामुळे शेतीच्या उत्पादनात मोठी घट झाली. पेरणीसाठी केलेल्या खर्चाची परतफेड कशी करावी, या आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. संबंधित सज्जाच्या तलाठ्याने घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
ज्ञानेश्वर कोळेकर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकरी हे परमेश्वर कोळेकर यांचे भाऊ होते.