फुलवळ, पुढारी वृत्तसेवा : कंधार तालुक्यातील फुलवळ सह आंबूलगा, सोमासवाडी, मुंडेवाडी, कंधारेवाडी, पानशेवडी , गऊळ, जंगमवाडी, वाखरड सह परिसरात ता. २० मार्च रोज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन झाले. या अचानक सुरुवात झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे गहू, हळद, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, करडई सह अन्य उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
सध्या सर्वत्र हळद काढणे , गहू कापणे , राशी करणे ही शेतकऱ्यांची कामे चालू असून कापलेल्या गव्हाचे काड शेताने उघड्यावरच असल्याने या अचानक आलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांची तारांबळ उडाली. शेतात असलेल्या जनावरांचेही हाल झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान पाहून तोंडचा घास या अवकाळी पावसाने हिरावला असल्याच्या भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. तेव्हा संसाराचा गाडा हाकावा तरी कसा असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.