Nanded Heatwave | नांदेड-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत शासकीय कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्‍यू  
नांदेड

Nanded Heatwave | नांदेड-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत शासकीय कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्‍यू

नायगाव-मुखेड मार्गावर दुर्दैवी घटना; कृषी विभागातील कर्मचाऱ्याच्या निधनाने हळहळ

पुढारी वृत्तसेवा

नायगाव, : नांदेड-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत नायगाव शहरात सोमवारी दुपारच्या सुमारास एका शासकीय कर्मचाऱ्याचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रचंड उष्म्याच्या लाटेमुळे चक्कर येऊन पडल्याने हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत व्यक्तीचे नाव नागेश शेेरराव पाटील (वय ४५, रा. मुखेड) असे असून ते पंचायत समिती मुखेड येथील कृषी विभागात लिपिक पदावर कार्यरत होते. सोमवारी काही वैयक्तिक कामानिमित्त ते नायगाव येथे आले होते. दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास नायगाव शहरातील महामार्गालगत ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांना नायगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सध्या राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट असून, नांदेड जिल्ह्यातही तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. अशा परिस्थितीत नागेश पाटील यांना उष्माघातामुळे चक्कर येऊन ते कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

नागेश पाटील यांच्या अकस्मात निधनाने पंचायत समिती, कृषी विभाग तसेच मुखेड परिसरात शोककळा पसरली आहे. शांत, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ व चार बहिणी असा मोठा परिवार आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT