हदगाव : येथील तहसील कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती कमलबाई गंगाधर क्षीरसागर (५५) यांचा मृतदेह वाळकी फाटा परिसरातील तळ्याच्या काठावर आढळून आल्याने शहरात खळबळ माजली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. त्यांचा हा मृत्यू नैसर्गिक आहे, आत्महत्या आहे की घातपात, याबाबत सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
श्रीमती कमलबाई क्षीरसागर या शनिवारपासून घरातून बेपत्ता होत्या. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्या मिळून आल्या नाहीत. विशेष म्हणजे त्यांचा मोबाईल फोनही बंद (नॉट रीचेबल) लागत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. अखेर मंगळवारी (१३ जानेवारी) सकाळी त्यांचा नातू सतीश संतोष वाघमारे आणि त्यांच्या सुनेने हदगाव पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर काही वेळातच, वाळकी फाटा येथील जय केदारनाथ पेट्रोल पंपाजवळील तळ्याच्या काठावर एक मृतदेह असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तो मृतदेह कमलबाई क्षीरसागर यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
कमलबाई यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा असा संशयास्पद अंत झाल्याने पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.