Hadgaon Tehsil farmer self immolation attempt
हदगाव : हदगाव तालुक्यात शेतीकडे जाणाऱ्या वहीवाट रस्त्याच्या वादातून दोन शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना (दि. २४ डिसेंबर) घडली. बालाजी गुणाजी डुरके व दत्ता नारायण डुरके यांनी तहसीलदारांच्या कक्षाबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तहसील कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना पकडत मोठा अनर्थ टाळला. विशेष म्हणजे अशी घटना घडली असताना स्थानिक पोलिसांना याबाबत काहीच माहिती नव्हती का ? शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वहीवाट रस्ता गैरअर्जदारांनी अडविल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने (दि. १४ मे) व नंतर अपील फेटाळत (दि. १२ नोव्हेंबर) रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. तरीही तहसील प्रशासनाकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.रस्ता बंद असल्याने शेतातील सोयाबीनची कापणी व रब्बी हंगामाची मशागत रखडली असून उपासमारीची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.दरम्यान, नायब तहसीलदार तामसकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत चार दिवसांत पोलिसांच्या मदतीने वहीवाट रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिले आहे.