Nanded Police Action Godavari River Sand Mafia
नवीन नांदेड : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात नांदेड पोलिसांनी मोठी मोहीम राबवत तब्बल 3 कोटी 21 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 16 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाला मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि. 16) मध्यरात्री गोदावरी नदीपात्रातील विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
कल्लाळ, भनगी, पिंपळगाव, मार्कंड आणि गंगाबेट परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, बोधनकर तसेच लिमगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने नियोजनबद्ध कारवाई केली.
छापेमारीदरम्यान पोलिसांनी 12 वाळू उपसा इंजिन, 11 मोठ्या बोटी, 237 तराफे आणि 32 ब्रास वाळू असा एकूण 3 कोटी 21 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नदीपात्रातून बाहेर काढणे शक्य नसल्याने 11 बोटी आणि 12 इंजिन जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले, तर 237 तराफे जाळून टाकण्यात आले.
पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच अनेक वाळू तस्कर अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. फरार आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 303(2), 3(5) तसेच गौण खनिज उत्खनन अधिनियमाच्या कलम 4 व 21 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रसाद कळके, सचिन कळके, हॅपी सिलेदार, अमित हंबर्डे, अरुण लुटे, पवन येवले, मोहन येवले, रमेश गच्चे, रघुनाथ मोरे, पवन मोरे, भागवत मोरे, विकास डक, मनोज क्षीरसागर, विवेक सोनटक्के, मोतीराम सोनटक्के आणि पुंडलिक सोनटक्के यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड ग्रामीण, सोनखेड व लिमगाव पोलिसांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.
नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सांगितले की, गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या आणि पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही वाळू माफियाला सोडले जाणार नाही. यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने सुरू राहतील.
तहसीलदार संजय वारकड यांनी सांगितले की, गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत आहे. अशा तस्करांविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम हाती घेतली असून दोषींवर दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई केली जाईल. भविष्यातही अशा कारवायांची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.