हसनाळ गावातील जलप्रलय आणि त्यांतील 5 मृत्यू ही नैसर्गिक नव्हे, तर प्रशासनाने घडवून आणलेली जीवितहानी असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला.  Pudhari News Network
नांदेड

Nanded Flood News : हसनाळला निसर्गाने नव्हे; प्रशासनाने घडविली जीवितहानी!

मृतांच्या नातेवाईकांचा आरोप : लेंडी धरण व घळ भरणीचा मुद्दा तापला

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : मुखेड तालुक्यातील पूर ओसरत असताना लेंडी धरण आणि या धरणावरील घळ भरणीच्या कामाचा मुद्दा तापत चालला आहे. हसनाळ गावातील जलप्रलय आणि त्यांतील 5 मृत्यू ही नैसर्गिक नव्हे, तर प्रशासनाने घडवून आणलेली जीवितहानी असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला. या सर्वांचा रोष जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांच्यावर व्यक्त झाला. तेथील सर्व मृतदेह हाती लागले आहेत.

रविवारी मध्यरात्री मुक्रमाबाद महसूल मंडळात झालेल्या विक्रमी आणि तडाखेबंद पावसाचा सर्वाधिक फटका लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील 9 गावांना बसला. नदीतील पाण्याच्या पातळीने काही तासांतच रौद्ररूप धारण केल्यामुळे हसनाळ गावात पाणीच पाणी झाले. त्यांत बेपत्ता झालेल्या 5 जणांपैकी तिघांचे मृतदेह सोमवारी सायंकाळपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनीच शोधले. चंद्रकला विठ्ठल शिंदे या महिलेचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हे सारे प्रशासकीय बेजबाबदारपणाचे बळी असल्याची संतप्त भावना व्यक्त करतानाच सर्व मृत्यूंना कार्यकारी अभियंता विवेकानंद नाईक यांना जबाबदार धरले. नंतर पीराजी म्हैसाजी थोटवे (वय 70) यांचाही मृतदेह सापडला.

रविवार-सोमवार दरम्यानच्या पूर परिस्थतीनंतर मुखेड तालुक्यात मदत आणि बचाव कार्य सुरू असतानाच लेंडी धरणावरील घळ भरणीच्या कामामुळे हसनाळ व इतर काही गावांवर भीषण आपत्ती कोसळल्याची बाब ‘पुढारी’ने समोर आणली होती. लोकांचा विरोध असतानाही ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घळ भरणीच्या कामाची घाई करणे, नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास बाधित लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची योग्य ती व्यवस्था न करणे, जवळच उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये किमान मूलभूत सोयी न करणे इत्यादी बाबींवरून पूरग्रस्तांनी प्रशासनाला धारेवर धरले. हसनाळमधील माधव नागोराव शिंदे यांनी तर कार्यकारी अभियंतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मंगळवारी केली.

पुराच्या पाण्यामध्ये बुडून व वाहून हसनाळ (ता.मुखेड) येथे 5 जणांचा मृत्यू झाला. त्या सर्वांचे मृतदेह सापडले आहेत. मुखेड-उदगीर तालुक्याच्या सीमेवरील मौजे धडकनाळ येथे सात जणं वाहून गेले होते. त्यापैकी तीन जणांचा शोध लागला. मात्र या दुर्घटनेतील तेलंगणातील 3 आणि देगलूर येथील एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. मुखेड तालुक्यात लहान-मोठी अशी एकूण 52 जनावरे दगावल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
किरण अंबेकर, निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड

प्रचंड पाण्यामुळे माध्यम प्रतिनिधींना सोमवारी जबर तडाखा बसलेल्या गावांमध्ये पोहचता आले नाही. पण मंगळवारी तेथे गेलेल्या माध्यम प्रतिनिधींसमोर पूरग्रस्तांच्या व्यथा, त्यांचा आक्रोश, त्यांची खदखद तीव्रपणे समोर आली. हसनाळ व अन्य गावांत वास्तव्यास असलेल्या लोकांची पर्यायी व्यवस्था करण्याच्या बाबतीत प्रशासनाने आपले कर्तव्य पार पाडले नसल्याची बाब समोर आली असून काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही घळ भरणीच्या कामाची घाई का करण्यात आली, असा सवाल सोमवारीच केला होता. या जलप्रलयानंतर खा.चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदत कार्यात उतरले असताना सत्ताधारी, विशेषतः भाजपाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी गायब असल्याचे दिसून आले.

जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून पूरग्रस्त भागातील मदत व बचाव कार्यासाठी लष्कराचे पथक मंगळवारपासून कार्यरत झाले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मुखेडच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. मंगळवारी दुपारनंतर हसनाळ येथील पिराजी म्हैसाजी थोटवे (वय 70) या वाहून गेलेल्या वृद्धाचाही मृतदेह हाती लागला. प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार रावणगाव, भासवाडी, भिंगोली आदी ठिकाणी पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या सुमारे 300 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पुनर्वसित गावातील काही नागरिक मूळ ठिकाणीच वास्तव्यास राहिल्यामुळे पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT