Nanded flood 
नांदेड

Nanded flood: जिल्ह्याला 4 खासदार, तरीही नुकसानग्रस्तांना मिळेना आधार; लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाने फिरवली पाठ

Marathwada flood news: सोयाबीनला फुटले कोंब; एैन काढणीच्यावेळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

धोंडीबा बोरगावे

फूलवळ: कंधार तालुक्‍यातील फूलवळ, कंधारेवाडी, मुंडेवाडी, वाखरड, सोमासवाडी, आंबुलगा,पानशेवडी, परिसरात गेले 4 ते 5 दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे सोयाबिन व उडीदाच्या शेंगांना नव्याने कोंब फुटले आहेत.

अगोदरच शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव नाही म्हणून शेतकरी हतबल झाला आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टीसारखं आस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. तालुक्‍यातील फूलवळ, आंबुलगा मंडळ क्षेत्रात अतिवृष्टीमुळे सोयाबिन उडीद, कापूस ऊस पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. तरीही अद्यापही या भागात एकाही लोकप्रतिनिधींनी किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्याने पाहणी दौरा किंवा मदत केली नसल्याने शेतकऱ्यांसह जनमानसात संतापाची लाट आहे.

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले सोन्यासारखं पीक पावसाच्या तडाख्यात मातीमोल झालं आहे. फुलवळ परिसरातील शेतकऱ्याचे शेतातील सोयाबिनचे पीक काळे पडून त्यास नव्याने कोंब फुटू लागले आहेत. शेतकऱ्यांनी जड अंतकरणाने खरीप पिकांच्या काढणीला सुरुवात केली आहे. मात्र पावसाचा मुक्काम काय पुढे सरकायला तयार नाही. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा शुक्रवार व शनिवार सलग दोन दिवस पावसानें हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा पुरता धास्तावला आहे.

सरकार सांगत आहे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊ, पण फुलवळ परिसरामध्ये आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री अतुल सावे, नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, लातूरचे खासदार काळगे राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे कंधार लोहामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही का ? किंवा जाणून बुजून लोहा कंधारकडे या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले..? असाही प्रश्न असाही येथील जनतेला पडलेला आहे.

कंधार तालुका नांदेड जिल्ह्यामध्ये येतो की नाही असाही संतप्त सवाल शेतकरी व नागरिकात दिसून येतो. कंधार तालुक्यातील लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा फुलवळ परिसरामध्ये नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी वेळ मिळेल का ? असाही प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. निवडणुका आल्या की या राजकारणी लोकांना शेतकरी कष्टकरी दिन दुबळ्यांची मते चालतात पण जेव्हा शेतकऱ्यावर संकट येते तेव्हा याच लोकप्रतिनिधींना यांचा विसर पडतो.

शासनाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी

फूलवळ परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबिन, उडीद, कापूस पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन काळे पडून त्यास नव्याने कोंब फुटू लागले आहेत. अतिवृष्टीचे संकट यामुळे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.शासनाने सरसकट नुकसानभरपाई लवकरात लवकर देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT