उमरखेड: मनरेगाअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्ण करूनही दोन वर्षांपासून अनुदान मिळाले नसल्याने उमरखेड तालुक्यातील चिल्ली (ज.) येथील पाच शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
येत्या सात दिवसांत अनुदान जमा न झाल्यास पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. चिल्ली (ज.) येथील अंकुश लक्ष्मण राठोड, भारत बाभनाजी राठोड, महेश कैलास राठोड, मिथुन परसराम जाधव आणि पंचफुलाबाई जालमसिंग जाधव यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) वैयक्तिक सिंचन विहिरींसाठी अर्ज केले होते.
या अर्जांना मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी विहिरींचे खोदकाम आणि बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण केले. मात्र, कामे पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यांत जमा झालेली नाही.
विहिरींचे काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी मजूर लावले होते. त्यांची मजुरी देण्यासाठी शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव केली. मात्र, अनुदान रखडल्याने मजुरांची देणी थकली आहेत. मजूर वारंवार पैशांची मागणी करीत असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. योजनेच्या अनुदानावर विसंबून कामे पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना आता देणी देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.