नांदेड : नांदेड शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात माळकौठा गावातील एका ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रकांत शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, हा आत्महत्येचा नसून घातपात असल्याचा संशय कुटूंबाने व्यक्त केला आहे. कर्ज वसुलीच्या नावाखाली त्यांना डांबून ठेवून अमानुष छळ करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मयत चंद्रकांत शिंदे यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून काही कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी त्यांना बुधवारी माळकौठा गावातून कंपनीच्या कार्यालयात आणण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, आज अचानक त्यांचा मृतदेह त्याच फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
मयत शेतकऱ्याची मुलगी रुपाली हिने या संपूर्ण प्रकारामागील वसुली करणाऱ्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. तीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी काही दिवसांपूर्वी एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडल्यानंतरही संबंधित कंपनीकडून सातत्याने पैशांची मागणी केली जात होती.
राज्यात ऑनलाइन कर्ज देणाऱ्या कंपन्या आणि फायनान्सच्या नावाखाली सर्वसामान्यांची पिळवणूक करण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. या संतापजनक प्रकारात पोलिसांनी तातडीने लक्ष घालून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या व दमदाटी करणाऱ्या या कर्जदात्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता पीडित कुटुंबाकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पैशाच्या वादातून हत्या; आईचा आरोप
पैशांच्या वादातून मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मयत चंद्रकांत यांच्या आईने अश्रू ढाळत गंभीर आरोप केला आहे की, "अवघ्या ७ हजार रुपयांच्या देवाणघेवाणीवरून संशयितांकडून तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली जात होती. पैशांसाठी फोनवरून सातत्याने दबाव टाकला जात होता आणि दोन दिवसांपासून माझ्या मुलाला ताब्यात ठेवून त्याचा छळ करण्यात आला. संशयितांनीच त्याची हत्या करून हा आत्महत्या केल्याचा बनाव रचला आहे." एकुलत्या एका मुलाच्या अशा अचानक जाण्याने हे कुटुंब पूर्णपणे हादरले असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
या संवेदनशील या प्रकरणात तक्रारदारांची तक्रार स्वीकारली आहे. शवविच्छेदन (पोस्ट मॉर्टम) अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.डॉ. निलाभ रोहन, पोलिस अधीक्षक