अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान स्थानिकांनी जेसीबी चालकावर हल्ला करत त्यास मारहाण केली. pudhari photo
नांदेड

Nanded Crime : नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; जेसीबी चालक गंभीर

घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला सोमवारी दुपारी हिंसक वळण लागले. एनटीसी मिल परिसरातील वाघी रस्त्यावर अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर स्थानिकांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात जेसीबी चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमधील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून संयुक्त मोहीम राबवली जात आहे. सोमवारी दुपारी हे पथक वाघी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पोहोचले. कारवाई सुरू असतानाच काही लोकांनी पथकावर हल्ला केला. जमावाने जेसीबी चालक मालू कोवळे यांना केबिनमधून ओढून बाहेर काढले आणि अमानुष मारहाण केली.

हल्लेखोरांनी पथकातील इतर कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य केले, ज्यात काही कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी चालक मालू कोवळे यांना प्रारंभी शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या हल्ल्यामुळे परिसरात बराच वेळ तणाव आणि गोंधळाचे वातावरण होते.

कारवाई न झाल्यास काम बंद

या प्राणघातक हल्ल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. संबंधित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास महापालिकेचे काम बंद ठेवण्याचा पवित्रा कर्मचारी संघटनांनी घेतल्याने प्रशासनासमोर मोठे पेच निर्माण झाले आहेत.

अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पथकावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ स्तरावर देण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
अजितपालसिंघ संधू, उपायुक्त (अतिक्रमण विभाग), मनपा, नांदेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT