बाळासाहेब पांडे
नायगाव: मुखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील जिशान लतीफ सय्यद (वय १७ वर्षे) या बारावीतील विद्यार्थ्याचा खून करून त्याचा मृतदेह जाळून ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नायगाव तालुक्यातील गडगा शिवारात दसऱ्याच्या दिवशी, २ ऑक्टोबर रोजी सकाळी समोर आली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
जिशान हा १ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून गावातून गायब होता. घरच्यांनी आणि नातेवाईकांनी शोध घेतला मात्र काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर २ ऑक्टोबर रोजी गडगा-कंधार रस्त्यालगतच्या सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला खडकावर जाळलेला मृतदेह आढळला. पोलीस पाटील संजय भांगे यांनी तात्काळ याची माहिती नायगाव पोलिसांना दिली.
सूचना मिळताच पोलीस उपअधीक्षक शाम पानेगावकर, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, पोउनि. गजानन तोटेवाड, सपोउनि. गजानन पेदे, बालाजीराव शिंदे यांच्यासह श्वानपथक, ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान बिअर-दारूच्या बाटल्या, दगड, चप्पल यांसारखी संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आली.
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळाचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविण्यात आले होते. काही वेळातच मयताची ओळख पटली. त्यानंतर मुलाचे वडील व नातेवाईक घटनास्थळी दाखल होऊन जिशान असल्याचे सांगितले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नायगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीचा शोध तीव्र केला आहे. या खूनाचा उलगडा लवकरच होईल, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
घटना स्थळी घडलेल्या प्रकाराची सर्वत्र चर्चा
मृत्यूचे वृत्त कळताच घरचे वडील व नातेवाईक त्या ठिकाणी आले असता नातेवाईकापैकी एकाच्या अंगावर धाऊन जाऊन चपलीने वडिलांनी एकास मारले अन् तूने घात किया...असे शब्द काढल्याचे प्रत्यक्ष दर्शिणे सांगितले. यामध्ये पोलिस माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून, पोलिस तपासात काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.