नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, तर उपाध्यक्षपदी डॉ.मीनल पाटील खतगावकर यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. मागील काही दिवसांपासून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला.
जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात सोमवारी सकाळी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराज हिरे यांनी उपस्थित संचालकांना निवडणुकीची प्रक्रिया अवगत केली. त्यानंतर दुपारी एक वाजता अध्यक्षपदासाठी डॉ.तुषार राठोड आणि उपाध्यक्ष पदासाठी डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. दोन्ही पदासांठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी हिरे यांनी या दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
अध्यक्षपदासाठी राजेंद्र केशवे यांनी तुषार राठोड यांचे नाव सुचविले तर मारोती जाधव यांनी त्यांना अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी राजीव गंगाधर जाधव यांनी मीनल पाटील यांचे नाव सुचविले तर संगीता पाटील डक यांनी अनुमोदन दिले.
नवनिर्वाचित 23 संचालकंपैकी आजच्या बैठकीत 22 संचालक उपस्थित होते, तर कृष्णा नागेश पाटील हे गैरहजर राहिले. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, भीमराव केराम आमदार, राजेश पवार, अमरनाथ राजूरकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, किशोर स्वामी, प्रणिता देवरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बँक नावारूपाला आणू-डॉ.मीनल पाटील
जिल्हा बँक संचालक मंडळाच्या इतिहासात यावेळी डॉ.मीनल पाटील यांच्या रूपाने प्रथमच महिला संचालकाची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. खासदार अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व संचालकांच्या सहकार्याने बँक नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनी त्यावेळी दिले.