Nanded DCC Bank pudhari photo
नांदेड

Nanded DCC Bank Performance : लातूर, परभणीच्‍या जिल्हा बँका नांदेड बँकेपेक्षाही अव्वलस्थानी!

खा. चव्हाण यांना सादर केलेल्या माहितीतील चित्र

पुढारी वृत्तसेवा

संजीव कुळकर्णी

नांदेड : मराठवाड्यातील परभणी आणि लातूर या दोन्हीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शतकोत्तर वर्षांची परंपरा सांगणार्‍या नांदेड जिल्हा बँकेपेक्षाही सर्वच बाबतीत अव्वल आणि सरस असल्याची बाब नांदेड बँकेच्या नव्या संचालक मंडळाचे नेेते खा.अशोक चव्हाण यांच्या बँक मुख्यालय भेटीच्या निमित्ताने समोर आली आहे.

नांदेड जिल्हा बँकेवर अलीकडे भाजपाची प्रथमच सत्ता आली असून बँकेतल्या सत्ताधारी संचालकांचे मार्गदर्शक या नात्याने खा.अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी बँकेच्या मुख्यालयास भेट दिली. संचालक मंडळातर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला, तर बँक प्रशासनाने एका सविस्तर टिपणीतून बँकेची सद्यस्थिती तसेच या बँकेला अव्वलस्थानी आणण्यासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजनांची मोठी जंत्रीच सादर केली.

नांदेड बँक दोन वर्षांपूर्वी भास्करराव खतगावकर यांच्या राजवटीतच मोठ्या संचित तोट्यातून मुक्त झाली. या बँकेच्या ताळेबंदातील ‘एनपीए’चे प्रमाण १५ टक्क्यांखाली आले. तसेच इतर काही बाबींमध्येही बरी स्थिती निर्माण झाली; पण नांदेड जिल्ह्याच्या तुलनेत लहान असलेल्या लातूर व परभणी या दोन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती सहकारी बँका अधिक सक्षम व स्वयंपूर्ण असल्याचे खा.चव्हाण यांच्यासमोर सादर झालेल्या आकडेवारीतून समोर आले.

भागभांडवल, ठेवी, राखीव निधी, गुंतवणूक, नफा इत्यादी ठळक बाबींसह इतर मापदंडांमध्ये लातूर बँक तर नांदेड जिल्हा बँकेहून अतिअव्वल तर परभणी बँकही ‘पुढचे पाऊल’ टाकत आपला कारभार चालवत आहे. लातूर बँकेकडील ठेवी तीन हजार कोटींच्या घरात, तर परभणी बँक २२०० कोटींच्या पुढे. नांदेड बँकेला मात्र अद्याप ९०० कोटींचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.

शेजारच्या जिल्ह्यांच्या बँकांच्या शाखा शंभरी पार, तर नांदेड बँक ६४ शाखांवर थांबलेली. गुंतवणूकीतही शेजारच्या बँका खूप पुढे (लातूर-२१८७ कोटी, परभणी-८७२ कोटी) तर नांदेड बँक ३७३ कोटींवर. नांदेड बँकेचा एनपीए १४ टक्के तर लातूर बँकेचा फक्त १.९३ टक्के. व्यवस्थापन खर्च प्रमाण प्रतिशाखा व प्रति कर्मचारी व्यवसाय वार्षिक नफा इत्यादी बाबींमध्ये शेजारच्या बँका खूप पुढे गेल्या असल्याचे चित्र नांदेड बँकेच्या नव्या संचालकांनाही शुक्रवारी बघावे लागले.

नांदेड बँकेला पाच बंद सहकारी साखर कारखान्यांकडून तब्बल २०० कोटींचे येणे आहे. प्रशासनाच्या दृष्टीने ही थकबाकी मोठी समस्या बनली आहे. ही तसेच इतर अनेक समस्या खा.चव्हाण यांच्यासमोर मांडतांनाच बँक प्रशासनाने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही उपाययोजनाही मांडल्या. त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी संचालक मंडळाला पुढाकार घ्यावा लागेल, असे सूचित करण्यात आले. काही उपाय स्थानिक पातळीवरचे आहेत, तर काही राज्यस्तरीय असल्याचे या टिपणीतून स्पष्ट झाले.

कर्मचारी संख्या अपुरी

खा.अशोक चव्हाण यांच्या वरील भेटीदरम्यान बँकेमध्ये कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याचेही सांगण्यात आले. मंजूर सेवकमांडनुसार या बँकेला ५४१ कर्मचार्‍यांची आवश्यकता असताना सध्या केवळ १२९ कर्मचारी मुख्यालय तसेच ६४ शाखांचा डोलारा सांभाळत आहेत. तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचार्‍यांचा अभाव असल्याचेही सांगण्यात आले. या बँकेला नवीन १५६ कर्मचारी भरती करण्याची परवानगी मिळाली होती; परंतु त्या भरतीला गतवर्षी स्थगिती मिळाली. सध्या हा विषय शासन दरबारी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT