नांदेड

Nanded Politics | जिल्हा बँकेसाठी उमरखेड तालुक्यात ‘देवसरकर विरुद्ध देवसरकर’ संघर्ष तीव्र

३१ डिसेंबरअखेरपर्यंत प्रतिनिधींची निवड पूर्ण करून मतदार यादी करण्यात येणार आहे

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत भागवत

उमरखेड : सहकार क्षेत्रातील निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणून तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमधून बँक प्रतिनिधी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३१ डिसेंबरअखेरपर्यंत प्रतिनिधींची निवड पूर्ण करून मतदार यादी करण्यात येणार आहे.

या प्रक्रियेत आपल्या पक्षाचा व गटाचे जास्तीत जास्त मतदार प्रतिनिधी जिल्हा बँकेवर पोहोचावे, यासाठी उमरखेड तालुक्यातील दोन देवसरकर पुन्हा एकदा आमनेसामने आले असून, सहकारातील राजकारण तापू लागले आहे. गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा बँकेवर संचालक म्हणून सातत्याने निवडून येणारे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचे तालुक्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व राहिले आहे. प्रत्येक सोसायटीत आपलाच प्रतिनिधी निवडून यावा, यासाठी त्यांनी कंबर कसली असून संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा बँकेच्या संचालक पदाचे इच्छुक राम देवसरकर हेही मैदानात उतरले असून, ‘देवसरकर विरुद्ध देवसरकर’ अशी थेट लढत होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. विशेष म्हणजे प्रकाश देवसरकर हे पूर्वी काँग्रेसमध्ये असताना बिनविरोध निवडून आले होते, मात्र सध्या ते भाजपात असल्याने ही लढत थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी रंगण्याची दाट शक्यता आहे.

राजकीय इतिहास पाहता, २००५ साली विद्यमान आमदार असलेल्या ॲड. अनंतराव देवसरकर यांच्या विरोधात देवराव काळे यांना उभे करून निवडून आणण्यात प्रकाश देवसरकर यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्या वेळी काँग्रेसचे युवा नेतृत्व म्हणून उदयास आलेले गोपाल अग्रवाल यांनीही निर्णायक योगदान दिले होते. आज तेच गोपाल अग्रवाल काँग्रेसचे नेते राम देवसरकर यांचे खंदे समर्थक म्हणून कार्यरत आहेत, ही बाब या संघर्षाला आणखी राजकीय रंग देणारी ठरत आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनीही महागाव तालुक्यातुन जिल्हा बँकेसाठी स्वतंत्र रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, बँक प्रतिनिधी निवडीसाठी सर्व पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता, काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी, ‘ताकही फुंकून पिण्याची’ खबरदारी घेतली असून, साम-दाम-दंड-भेद या सर्व नीती वापरण्याची तयारी सुरू आहे.

उमरखेड तालुक्यातील एकूण ५२ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये कोणत्या पक्षाचे किती प्रतिनिधी निवडून येतात, यावर जिल्हा बँकेच्या सत्ता समीकरणाचे भवितव्य ठरणार आहे. ३१ डिसेंबरनंतर हे चित्र स्पष्ट होणार असून, जिल्हा बँकेच्या निमित्ताने तालुक्याच्या राजकारणात नेमके कोण वरचढ ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT