Nanded District bank election politics heats up
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी पक्षातील काही प्रमुखांकडून आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीसह महायुतीतील प्रमुख नेत्यांशी खासदार चव्हाण चर्चा करणार असल्याचेही समजले.
खासदार अशोक चव्हाण यांचा सध्या नांदेड येथे मुक्काम असून मागील दोन दिवस त्यांनी नांदेड दक्षिण व नांदेड उत्तरच्या पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारी संदर्भात आढावा घेतला. इच्छुक उमेदवारांशीही त्यांनी चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या. शुक्रवारी दिवसभर चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशी अशोक चव्हाण यांनी निवडणुकीबाबत दोन तास चर्चा केली. यावेळी माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांचीही उपस्थिती होती.
या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या चर्चेचा तपशील बाहेर आला नसता तरी जिल्हा बँक निवडणुकीच्या महत्त्वाच्या विषयावर ही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. बँकेची ही निवडणूक रंगतदार वळणावंर असतानाच उभय नत्यांच्या भेटीमुळे या निवडणूक प्रक्रियेत नाट्यमय घडामोडी घडतील असे संकेत आहेत.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकच्या निवडणुकीसाठी 30 जून पर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार आहेत. 25 जून पर्यंत 296 अर्जाची विक्री झाली तर दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 26 ते 28 जून पर्यंत शासकीय सुट्टी असल्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी पुढील दोन दिवस शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच दमछाक होणार आहे-
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीप्रमाणे जिल्हा बँक निवडणुकीतही खासदार अशोक चव्हाण यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. काँग्रेस नेत्यांशी चर्चा नंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशीही ते चर्चा करतील, अशी माहिती आहे. २ ते १६ जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.