नांदेड : जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने अर्धापूर आणि देगलूर तालुक्यात दोन मोठे छापे टाकले. या कारवाईत बनावट सुगंधित जर्दा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला असून, दुसऱ्या कारवाईत जुगार अड्ड्यातून 8 आरोपींना जेरबंद केले. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 7 लाख 37 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अर्धापुरात घरामध्येच बनावट जर्द्याचा बनाव
अर्धापूर येथील इंदिरानगर भागात सय्यद जाकीर उर्फ बाबा गुलाम दस्तगीर हा आपल्या राहत्या घरी बनावट जर्दा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता धक्कादायक प्रकार समोर आला.
आरोपी हा कमी प्रतीच्या जर्दामध्ये घातक रसायने, ग्लिसरीन आणि पॅराफीन मिसळून नामांकित कंपन्यांच्या नावाने पॅकेजिंग करत असे. पोलिसांनी घटनास्थळावरून जर्दा बनवण्याचे मशीन, कच्चा माल आणि रसायने असा एकूण 3 लाख 44 हजार 450 रुपयांचा साठा जप्त केला. अर्धापूर पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल असून पोहेकॉ. संतोष काळे तपास करत आहेत.
देगलूरमध्ये शेतातील जुगार अड्ड्यावर धाड
दुसरी कारवाई रविवारी देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुषावाडी शिवारात करण्यात आली. रंजित इंगोले यांच्या शेतातील एका खोलीत जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून 8 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 36,340 रुपये रोख, 8 मोबाईल आणि 7 दुचाकी असा एकूण 3 लाख 93 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोउपनि. महाजन मैसनवाड पुढील तपास करत आहेत.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोहेकॉ. प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.