नांदेड : घरगुती गॅस सिलिेंडरमधून बेकायदेशीररीत्या व्यावसायिक गॅस सिलिेंडरमध्ये गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. धनेगाव येथील इकबाल नगर भागात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ११७ गॅस सिलिेंडरसह ३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी जिल्ह्यात घरगुती सिलिंडरच्या गैरवापरासह गॅस रिफिलिंग आणि गॅसची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांचे पथक ९ सप्टेंबर रोजी नांदेड ग्रामीण हद्दीत गस्तीवर होते.
यादरम्यान इकबाल नगर, धनेगाव येथील एका घरात घरगुती गॅस सिलिेंडरचा बेकायदेशीर साठा करून इलेक्ट्रिक मोटर व स्पिअर पंपाच्या साह्याने व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरला जात असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी छापा मारला. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्यांच्याकडे गॅस साठवणूक किंवा विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. अत्यंत ज्वलनशील गॅसची निष्काळजीपणे हाताळणी करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींवर नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव व एलसीबीचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश कोरे, सहाय्यक फौजदार दारासिंग राठोड, पोलिस अंमलदार मोहन हाक्के, सुनील गटलेवार, श्रीराम दासरे, संघरन गायकवाड, मनोज राठोड, आवाराव पिंगलवाड, लहू चाटे आणि महेश बडगु यांच्या पथकाने केली.