Nanded murder case pudhari photo
नांदेड

Nanded Crime : इंदरजितसिंघ बावरी खून प्रकरणाचा उलगडा; पाच आरोपी अटकेत

फायनान्स कंपनीच्या हप्त्यापोटी जप्त केलेल्या दुचाकीच्या वादातून हा पूर्व नियोजित कट रचून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धनेगाव येथे घडलेल्या इंदरजितसिंघ बावरी (वय २५, ) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. फायनान्स कंपनीच्या हप्त्यापोटी जप्त केलेल्या दुचाकीच्या वादातून हा पूर्व नियोजित कट रचून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत इंदरजितसिंघ बावरी आणि त्यांचा चुलत भाऊ फायनान्स क्षेत्रात काम करतात. सुमारे आठ दिवसांपूर्वी त्यांनी हिंगोली गेट परिसरातून आरोपीची थकीत हप्त्यांची 'बजाज पल्सर-२२०' मोटारसायकल कंपनीच्या आदेशानुसार जप्त करून यार्डात जमा केली होती. याच कारणावरून आरोपींच्या मनात प्रचंड राग होता.

​दिनांक ८ ऑगस्ट रोजी इंदरजितसिंघ आपल्या भावासोबत धनेगाव येथील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेले असताना, आरोपींनी तेथे गाठून जुन्या वादातून खंजराने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात इंदरजितसिंघ यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या भावाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ​

तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने १) दिलीप पुंडलिक डाकोरे (वय ३३, रा. रविनगर, जुना कौठा), २) कृष्णा दिगंबर बारोळे (वय २९, रा. किवळा, ता. लोहा), ३) रणजीत ऊर्फ रंज्या चंद्र सूर्यवंशी (वय २३, रा. गोवर्धनघाट टेकडी), ४) ज्योती जगदिश बिगानिया (वय ४०, रा. जुना कौठा) आणि ५) एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.

​नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि (भारतीय न्याय संहिता) व हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. घटनेत वापरलेली शस्त्रे आणि इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

गुन्हे शाखेकडून तातडीने कारवाई

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांना तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी घटनास्थळावरील 'सीसीटीव्ही' फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT