Eknath Shinde : दुष्काळाच्या छाताडावर पाय रोवून पुढे जाण्याची गरज file photo
नांदेड

Eknath Shinde : दुष्काळाच्या छाताडावर पाय रोवून पुढे जाण्याची गरज

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

Nanded Deputy Chief Minister Eknath Shinde drought

नांदेड, पुढारी वृत्तसेवा आपण स्वाभिमानी महाराष्ट्रातले नागरिक आहोत, कोणत्याही संकटाला न घाबरण्याची आपली परंपरा आहे. या दुष्काळाच्या छाताडावर पाय रोवून आपण पुढे गेले पाहिजे, केंद्र तसेच राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात दिली.

वाडी बु. येथील १०० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण रविवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, आ. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ. बाबूराव कदम, आ. आनंद बोंढारकर आर्दीची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिथे संकट तिथे सरकार व शिवसेना आहे. राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमितभाई शहा यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. त्यांनीही महाराष्ट्रातील जनता व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले आहे. दुष्काळाच्या या संकटात विरोधकांनी राजकारण करू नये, या संकटातून बाहेर पडण्यासाठी चांगल्या सूचना कराव्यात, ही वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे, त्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने महाराष्ट्रात तात्काळ दुष्काळ जाहीर करून दिवाळीसाठी तातडीची ५,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत तातडीची असल्यामुळे विरोधकांनी याबाबतही राजकारण करण्याची गरज नाही, यापुढेही शेतकऱ्यांना मदत मिळतच राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह थांबणार नाहीत, शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. सर्व खासदार, आमदार व मंत्र्यांना तशा सूचना केल्या असून त्यानुसार हदगाव येथे १०० सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन आ. बाबूराव कदम करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT