सामाजिक कार्यकर्ते आकाश कोकणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रतीकात्मक सरण रचून त्यावर झोपत आमरण उपोषण केले  Pudhari
नांदेड

Nanded Hunger Strike | निपाणी सावरगावात स्मशानभूमीसाठी सरणावर झोपून उपोषण

जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे; शिष्टमंडळाला नांदेडला येण्याचे निमंत्रण

पुढारी वृत्तसेवा

Deglur Nipani Savargaon Hunger Strike

फजल मुल्ला, देगलूर : देगलूर तालुक्यातील निपाणी सावरगाव येथे सार्वजनिक स्मशानभूमीसाठी सामाजिक कार्यकर्ते आकाश कोकणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रतीकात्मक सरण रचून त्यावर झोपत आमरण उपोषण केले. गावात विविध समाजांची लोकवस्ती असून, मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले.

गावात सार्वजनिक स्मशानभूमी उपलब्ध करून देऊन संबंधित जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद घ्यावी, अशी मागणी कोकणे यांनी केली आहे. यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी त्यांनी प्रशासनाला निवेदन देत मागणी मान्य न झाल्यास घरात बसून आमरण उपोषण करण्याचा तसेच त्यानंतर मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार २४ ऑगस्टपासून त्यांनी घरात आमरण उपोषण सुरू केले.

त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन २९ ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रतीकात्मक सरणावर झोपून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी (२९ ऑगस्ट) सकाळी आकाश कोकणे यांनी गावकऱ्यांसमवेत आंदोलन सुरू केले.

या आंदोलनाची माहिती मिळताच काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी निपाणी सावरगाव येथे धाव घेत आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी समाजमाध्यमाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधून गावकऱ्यांची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील शिष्टमंडळाला नांदेड येथे भेटीसाठी बोलावून निपाणी सावरगावला सार्वजनिक स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर रामदास पाटील सुमठाणकर यांच्या हस्ते आकाश कोकणे यांनी उपोषण मागे घेतले.

सार्वजनिक स्मशानभूमीअभावी धनगर समाजासह इतर समाजांनाही अंत्यविधीसाठी अडचणींचा सामना करावा लागत असून, मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीही जागा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT