उमरखेड : पैनगंगा नदीच्या पात्रात मुरली येथील बंधार्यात गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा अखेर २८ दिवसांनंतर छडा लागला आहे. पत्नीने मुलाच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणी पत्नी व मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मारोती गंगाराम डुकरे (वय ६०, रा. जलदरा, पोस्ट इस्लापूर, ता. किनवट, जि. नांदेड) असे मृतकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह दि. ९ जानेवारी रोजी सहस्त्रकुंड धबधब्याजवळील मुरली येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या परिसरात पैनगंगा नदीच्या पात्रात गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
मृतकाच्या अंगावरील कपड्यांवर असलेल्या “City Mens Tailor” या शिलाई लेबलच्या आधारे तपासाची दिशा ठरविण्यात आली. पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या आदेशानुसार चार विशेष तपास पथके गठीत करून घटनास्थळाच्या ५० किमी परिसरात तसेच हिंगोली, नांदेड व तेलंगणा राज्यातील निर्मल व आदिलाबाद जिल्ह्यांत बेपत्ता व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली.
तपासादरम्यान इस्लापूर पोलीस ठाणे हद्दीतील जलदरा गावाचे पोलीस पाटील सुरेश वाघमारे यांनी मारोती डुकरे हे बेपत्ता असल्याची माहिती दिली, मात्र त्यांची मिसिंग नोंद नसल्याचेही स्पष्ट झाले. यानंतर मृतकाचा मुलगा प्रदीप मारोती डुकरे (वय २५) व पत्नी पार्वताबाई मारोती डुकरे यांची चौकशी करण्यात आली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला.
गोपनीय पाळत ठेवल्यानंतर त्यांच्या घराची पाहणी केली असता मृतकाच्या कपड्यांवर व घरातील कपड्यांवर एकसारखेच “City Mens Tailor” चे शिलाई लेबल आढळून आले. सखोल चौकशीअंती आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. मुलाने व पत्नीने मिळून मारोती डुकरे यांचा खून करून मृतदेह ताडपत्रीत बांधून नदीपात्रात फेकून दिल्याचे उघड झाले. दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
हत्येमागील कारण
मृतक मारोती डुकरे यांना दारूचे व्यसन होते. ते दररोज घरी आल्यानंतर पत्नीला क्षुल्लक कारणांवरून मारहाण करीत असत. घटनेच्या दिवशी भाजी नीट केली नाही या कारणावरून मारहाण सुरू असताना मुलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीतच मारोती डुकरे यांचा मृत्यू झाल्याची कबुली पत्नी व मुलाने दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
एलसीबी पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई एलसीबी पथक, यवतमाळ यांनी पार पाडली. उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड व बिटरगाव चे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अथक परिश्रम घेतले. API मनीष गावंडे, PSI गजानन राजमलू, PSI शरद लोकरे,ASI सै. साजीद, ASI योगेश गटलेवार, इत्यादी कर्मचारी या तपासात सहभागी झाले होते.