नायगाव : शेतमजुरी करून आपल्या घरी परतत असताना भरधाव एसटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.२१) सायंकाळी नायगाव तालुक्यातील मुखेड नरसी रोडवरील रातोळी शिवारात घडली. नरसबाई शंकर कांबळे असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरसबाई कांबळे या नेहमीप्रमाणे शेतमजुरीचे काम आटोपून आपल्या घरी पायी आपल्या घरी जायला निघाल्या. यावेळी मुखेड नरसी रोडवर भरधाव वेगात आलेल्या एसटी बसने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे काही काळ परिसरात शोककळा पसरली होती.
घटनेची माहिती मिळताच मुखेड आगाराचे आगार प्रमुख सु. धु. पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत शासनाच्या नियमानुसार मिळणारी सर्व आर्थिक व शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, नायगाव पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी बालाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नायगाव व येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रातोळी परिसरात शोककळा पसरली असून शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या अकाली निधनामुळे ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.