Crime Pudhari
नांदेड

Nanded crime news | भरचौकात दोन युवकांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

नायगाव शहरात खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : नांदेड–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नायगाव शहरातील डॉ. हेडगेवार चौकात शुक्रवारी सायंकाळी भरचौकात दोन युवकांवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे नायगाव शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंटूर येथील तेजस कानडे व नारायण चौहान हे दोघे युवक नायगाव शहरात आले असताना डॉ. हेडगेवार चौक परिसरात थांबले होते. यावेळी अचानक तीन ते चार अज्ञात युवक मोटारसायकलवरून तेथे आले आणि त्यांनी दोघांनाही गाठून धारदार शस्त्राने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

या हल्ल्यात तेजस कानडे व नारायण चौहान हे दोघेही गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. दरम्यान, हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तातडीने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली नव्हती. हल्लेखोर कोण होते, हल्ल्यामागील कारण काय याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

भरदिवसा शहरातील गजबजलेल्या चौकात ही घटना घडल्यामुळे नायगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

नायगाव शहरातील गजबजलेल्या चौकात भरदिवसा दोन युवकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात अशा घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी शहरात गस्त वाढवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT