नांदेड

Nanded Crime News | टेंभुर्णी येथे किरकोळ वादातून तरुणाचा तरुणाचा दगडाने ठेचून खून

देवस्थानाच्या यात्रेदरम्यान खळबळजनक प्रकार, दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

Nanded Crime News

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथे देवस्थानाच्या यात्रेदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोक्यात गंभीर मार लागल्याने २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना अटकही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वादातून जोरदार भांडण, दगडाने मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी येथील गणेश किशनराव वडजे (वय २९) शेती व्यवसाय करत होता. ९ मार्च रोजी गावात देवस्थानाची यात्रा असल्याने रात्री गावात मोठी गर्दी होती. गणेश व त्याचे कुटुंबीय जेवण करून यात्रेकडे गेले असताना गावातील पप्पू उर्फ जैनराज सटवा सुताडे (वय ३१, व्यवसाय ऑटोचालक) याच्याशी काही कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.

डोक्यावर गंभीर मार; घटनास्थळीच मृत्यू

या भांडणादरम्यान आरोपीने गणेश वडजे यांच्या डोक्यावर दगडाने जोरदार मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. रात्रीच्या अंधारात ते जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. सकाळी गावकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर घरच्यांना कळवले. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता गणेश वडजे हे मृत अवस्थेत आढळून आले.या प्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पप्पू उर्फ जैनराज सटवा सुताडे व शाम सटवा सुताडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मयत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नायगाव ग्रामीण रुग्णालयात करून सायंकाळी प्रेत अंत्यविधीसाठी टेंभुर्णी येथे नेण्यात आल्याची माहिती सरपंच मुन्ना पाटील वडजे यांनी दिली.

यात्रेच्या रात्रीच घडली रक्तरंजित घटना

टेंभुर्णी गावात यात्रेवेळी अनेक खूनाच्‍या घटना घडल्‍या आहेत; पण हा खून किरकोळ वादातून झालेला आहे. येथील देवस्थानाची यात्रा सुरू असताना रात्री उशिरा हा प्रकार घडला. यात्रेच्या ठिकाणी झालेल्या किरकोळ वादातूनच हा खून झाल्याची माहिती समोर आली असून गावातील आनंदाचे वातावरण एका क्षणात शोकाकुल झाले.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिस ठाणे येथे परिविक्षाधीन कालावधीवर आलेले सहायक पोलिस अधीक्षक शशांक गौड, बिलोली प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील (धर्माबाद), तसेच पोलिस निरीक्षक मारकड साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोमानाळकर साहेब करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT