Naigaon petrol attack
नायगाव : विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला, याचा राग मनात धरून पीडित महिलेच्या पतीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा अमानुष प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना नायगाव तालुक्यातील बेंद्री येथे दि. २९ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पीडितेचा पती सुमारे ५० टक्के भाजला असून, त्याच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या थरारक घटनेमुळे संपूर्ण बेंद्री गावात भीती व संतापाचे वातावरण पसरले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शाम पानेगावकर यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
बेंद्री येथील संतोष माधवराव बेंद्रीकर या तरुणाची घरासमोरील महिलेवर गेल्या अनेक दिवसांपासून वाईट नजर होती. पीडित महिलेला अश्लील शेरेबाजी करणे, छेडछाड करणे तसेच दि. २२ डिसेंबर रोजी जबरदस्तीने हात धरून ओढणे असा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलेने नायगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे संतोष बेंद्रीकर याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा नोंद होऊनही आरोपी मोकाट फिरत असल्याने पीडित कुटुंबात असुरक्षिततेची भावना वाढत गेली. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव अधिकच तीव्र झाला.
विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूर कृत्याला हात घातला. पहाटेच्या सुमारास पीडित महिलेच्या पतीवर पेट्रोल टाकून त्याला पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, विनयभंग प्रकरणातील मुख्य आरोपीवर वेळेत कारवाई न झाल्यामुळेच ही गंभीर घटना घडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पीडित महिला व नातेवाइकांनी विनयभंग प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.