नायगाव : नायगाव, कुंटूर, मुदखेड, पालम, पिंपळदरी, जालना आणि मुंबईपर्यंत घरफोड्या व वाहनचोरी करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा अखेर नायगाव पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आठ गुन्हे उघडकीस आणत तब्बल ₹४ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर चार आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला. सांगवी टी-पॉईंट परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी नायगाव, कुंटूर, मुदखेड, पालम, पिंपळदरी तसेच जालना आणि मुंबई परिसरात घरफोडी, दुकाने फोडणे आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, पल्सर, अपाची आणि रॉयल एनफिल्ड बुलेटसह विविध चोरीचा ऐवज असा ₹४.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे नायगावसह अनेक भागांतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
चार आरोपी फरार; शोधमोहीम सुरू
या प्रकरणात शंकर उर्फ सोनू पिराजी पवार आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून राहुल गुंडाळे, लखन मारखुळे, बाबा उर्फ बालू पवार आणि अमोल चव्हाण हे आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथके शोध घेत आहेत.