नांदेड

Nanded Crime : गडग्यात अवैध गोवंश वाहतूक पकडली; नायगाव पोलिसांकडून ८ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघे गजाआड

बजरंग दलाच्या पाठलागानंतर पोलिसांची मोठी कारवाई; बोलेरो जप्त

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : नायगाव तालुक्यातील गडगा येथे शनिवारी (दि. २५ जुलै) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन गायींची वाहतूक करणाऱ्या 'एमएच २६ सीएच १९१५' क्रमांकाच्या बोलेरो पिकअपचा पाठलाग करून ती अडविली. घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, दोन गायी व बोलेरो पिकअप जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल बालाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६९/२०२६ नोंदवण्यात आला आहे. यात महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियमातील कलम ५, ५-अ, ५-ब, ९ तसेच भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पिरसाब हनुसाब कुरेशी व आलमसाब पिरसाब कुरेशी (दोघे रा. मुकरामाबाद, ता. मुखेड) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे ८ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप तसेच २५ हजार रुपये किमतीच्या दोन गायी, असा एकूण ८ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल शिंदे व पोलीस अंमलदार बोईनवाड यांनी तत्परतेने कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या दोन गायी सुरक्षित ताब्यात घेण्यात आल्या असून, वाहन नायगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई यशस्वी ठरली. गोवंश वाहतुकीबाबत मिळालेल्या माहितीची तात्काळ दखल घेत नायगाव पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आणि मुद्देमाल जप्त केला. या घटनेमुळे गडगा परिसरात काही काळ खळबळ उडाली असून, प्रकरणाचा पुढील तपास नायगाव पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT