Congress Pudhari
नांदेड

Nanded Congress : जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिल्लीत काँग्रेसच्या बैठका सुरू

मेच्या पहिल्या आठवड्यात मिळणार नूतन जिल्हाध्यक्ष

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः संघटन सृजन अभियानांतर्गत नूतन जिल्हाध्यक्ष निवडीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत अ.भा.काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांच्या मंगळवारपासून बैठका सुरू झाल्या असून या महिनाअखेर अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाध्यक्ष जाहीर होण्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान श्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

अ.भा.काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, रमेश चेनीथला यांच्यासह प्रमुख नेते बैठका घेणार असून पुढील महाराष्ट्रातील संघटनात्मक बदल आणि अन्य विषयावर पुढील तीन दिवस या बैठका चालतील, अशीही माहिती मिळाली आहे. नूतन जिल्हाध्यक्ष निवडीबाबत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आलेल्या अहवालावर या तीन दिवसीय बैठकांमध्ये चर्चा होणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील संघटनात्मक फेरबदलसाठी केंद्रीय निरीक्षक हरकला वेणूगोपाल राव यांनी सर्वप्रथम ऑनलाईन अहवाल के.सी.वेणुगोपाल यांच्याकडे सादर केल्याचे सांगण्यात येते. जिल्हाध्यक्षपदासाठी झालेल्या मुलाखती, पदाधिकाऱ्यांची मते, आलेल्या तक्रारी आणि त्यातून काढण्यात आलेला निष्कर्ष याबाबत हरकला वेणुगोपाल राव या बैठकीत पक्षश्रेष्ठींना प्रत्यक्ष भेटीत देतील. त्यानंतर पक्षश्रेष्ठी या निवडी संदर्भात निर्णय घेणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

वेणुगोपाल राव यांनी 9 ते 20 एप्रिल दरम्यान जिल्ह्याच्या दौरा केला. यावेळी त्यांचा मुक्काम शहरातील विट्स हॉटेलमध्ये होता. त्यांनी आठ ते दहा दिवसात विविध विधानसभा मतदारसंघांत भेट देऊन सखोल आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी पक्षातील अंतर्गत स्थिती, पदाधिकाऱ्यांची कार्यक्षमता, निवडणुकीतील कामगिरी, पक्षातील स्लीपर सेल आणि निष्क्रिय ठरलेले विधानसभा उमेदवार याविषयी तपशीलवार माहिती गोळा केली. काही ठिकाणी काँग्रेसमध्ये राहून विरोधी पक्षासाठी काम करणाऱ्यांची माहिती संकलित करून ती अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते.

नांदेड दक्षिण आणि उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच शहरध्यक्ष या तिन्ही स्तरांवरील पदांची निवड प्रक्रिया दिल्लीत होणाऱ्या बैठकीत पूर्ण होणार असून या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नूतन जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर होणे अपेक्षित आहे. संघटन सृजन अभियानातून कार्यक्षम व निडर नेतृत्वाला संधी देण्यावर भर असल्याचे वेणूगोपाल राव यांनी नांदेड दौऱ्यातच स्पष्ट केले होते.

दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची माळ रामदास पाटील सुमठाणकर, प्रा. संजय शेळगावकर, डॉ. भगवान मनुरकर तर उत्तर जिल्हाध्यक्षपदासाठी विठ्ठल पावडे, प्रा. संदीपकुमार देशमुख, डॉ. रेखा चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. शहराध्यक्षपदासाठी महेश देशमुख, बालाजी चव्हाण, सुरेंद्र घोडजकर यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे.

  • आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपा सोबतच प्रमुख लढत होणार असल्याने निष्ठावंत पदाधिकाऱ्याकडेच जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा आग्रह हरकला वेणुगोपाल राव यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केला होता. महापालिका निवडणुकीत काही पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजपावासी असलेल्या आपल्या नातेवाईकांना मदत केल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नवे आणि निष्ठावंत चेहरे काँग्रेसला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT