Child marriage pudhari photo
नांदेड

Nanded child marriage prevention : नांदेड जिल्ह्यात 11 बालविवाह रोखण्यात यश

चाईल्ड हेल्पलाईनची मदत; महिला, बालविकास विभागाचे प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या बालविवाहांच्या विरोधात महिला व बाल विकास विभागाने कंबर कसली असून, गेल्या काही दिवसांत प्रशासनाने तब्बल 11 बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, बालविवाह लावणाऱ्या प्रवृत्तींचे धाबे दणाणले आहेत.

19 एप्रिलपासून जिल्ह्यात अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडत आहेत. याच काळात काही अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न लावून दिले जात असल्याची माहिती चाईल्ड लाईन 1098 या हेल्पलाईनवर प्राप्त झाली होती. माहिती मिळताच प्रशासनाने वेळ न गमावता पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने थेट विवाहस्थळी धाड टाकली. वधू-वरांच्या वयाची शहानिशा केली असता ते अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर हे विवाह रोखण्यात आले.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कारवाई करण्यात आली: लोहा : 3, नांदेड : 3, नायगाव : 2, देगलूर, भोकर व मुखेड : प्रत्येकी 1. या मोहिमेत महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत अधिकारी आणि अंगणवाडी सेविका यांनी समन्वयाने काम केले.

ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ 1098 वर द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

काय सांगतो कायदा?

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार लग्नासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह लावणे, त्यासाठी प्रोत्साहन देणे किंवा उपस्थित राहणे हा गंभीर गुन्हा असून यामध्ये कारावास व दंडाची तरतूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT