Nanded soybean cotton sowing 
नांदेड

Nanded soybean cotton sowing-नांदेड जिल्ह्यात नगदी पिकांवर भर; सोयाबीन, कापसाची पेरणी सुसाट

Nanded soybean cotton sowing- नांदेड जिल्ह्यात नगदी पिकांवर भर; सोयाबीन, कापसाची पेरणी सुसाट

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात रखडलेल्या पावसाने मागील आठवड्यापासून जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. यंदाच्या हंगामात नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांकडे सर्वाधिक कल असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २ लाख ५१ हजार ४४५ हेक्टरवर (३३.०२ टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, पारंपरिक ज्वारी पिकाकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात भीषण जनावरांच्या चाराटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.

सुरुवातीला मान्सूनने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु, पावसाने दमदार पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची कामे आटोपण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण खरीप क्षेत्र ७ लाख ६१ हजार ५७४ हेक्टर असून, ३ जुलैअखेर त्यापैकी ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

ज्वारी घटली, चिंता वाढली! जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र २४ हजार १५१ हेक्टर असताना, प्रत्यक्षात केवळ ५१४ हेक्टरवरच (२.१३ टक्के) पेरणी झाली आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मते, ज्वारीऐवजी सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांमधून अधिक आर्थिक फायदा होत असल्याने शेतकरी ज्वारी पेरणी टाळत आहेत. मात्र, यामुळे जनावरांच्या कडब्याचा (चाऱ्याचा) प्रश्न गंभीर बनण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा नेहमी प्रमाणे नगदी पिकांचाच बोलबाला आहे

सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झाला आहे. सोयाबीनच्या एकूण ४.१८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३६ हजार ४६ हेक्टरवर (३२.५४ टक्के) पेरणी झाली आहे. तर, कापसाची २ लाख १ हजार ४६१ हेक्टरपैकी ७९ हजार २०७हेक्टरवर (३९.३२ टक्के) लागवड पूर्ण झाली आहे.

कडधान्य आणि तृणधान्याची स्थिती

कडधान्यांमध्ये तूर पिकाची पेरणी ३२.६३ टक्के क्षेत्रावर झाली असून उडीद (१४.२७ टक्के) आणि मूग (१७.५० टक्के) पिकांचा पेरा अद्याप मागे आहे. तृणधान्यांचा विचार केला तर भाताची पेरणी २५.०६ टक्के, तर मक्याची पेरणी सर्वाधिक म्हणजेच ४९.०८ टक्के क्षेत्रावर पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस असाच राहिल्यास उर्वरित पेरण्यांनाही आणखी गती येईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT