लोहा : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि.२५ डिसेंबर) सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगातील कार रस्त्यातील डिव्हायडरला धडकून तिला भीषण आग लागली. या अग्नितांडवात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सोनखेड जवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२६ क्रमांकाची कार नांदेडहून लोह्याकडे अतिशय वेगाने जात होती. सोनखेडपासून साधारण ३ किमी अंतरावर असलेल्या वंदना पेट्रोल पंपाजवळ चालकाचा ताबा सुटला. कार थेट डिव्हायडरवर चढल्याने मोठा आवाज झाला आणि क्षणात कारने पेट घेतला.
धडक इतकी भीषण होती की, कारला आग लागल्यानंतर आत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीच्या भक्षस्थानी पडल्याने त्या व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती नांदेड येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.
अपघाताची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पांडुरंग माने आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने लोहा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी जळालेली कार बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील अतिवेगाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.