नांदेड : टी-शर्टचा व्यवसाय वाढवण्याचे खोटे आमिष दाखवून आणि बँक खात्याचा गैरवापर करत एका व्यापाऱ्याची तब्बल ८४ लाख ६६ हजार ६६४ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नांदेड येथील महालक्ष्मी क्लोथिंग कंपनी आणि न्यु टाऊन कोलकाता येथील मॅजेस्टिक हॉटेल येथे हा फसवणुकीचा प्रकार घडला.
आरोपी राजेंद्र दुबे, आयुष, सनि सिंघ (तिघे रा. कोलकाता) आणि विजय खटके (रा. गोपाळ चावडी, नांदेड) यांनी संगणमत करून फिर्यादी मोहित सुशील खियानी (वय २६, रा. श्रीपादनगर, कौठा, नांदेड) यांना टी-शर्टचा व्यवसाय मोठा करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादीच्या नांदेड येथील 'यश बँक' शाखेच्या खात्याचा गैरवापर करत त्यात एकूण ८४,६६,६६४ रुपये जमा करून घेतले आणि ती रक्कम इतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहित खियानी यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) दुरपडे हे करत आहेत.