नांदेड : महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीने आपल्या संघटनात्मक जिल्ह्यांकरिता ७४ प्रभारींची नियुक्ती करताना नांदेडमधील खा. डॉ. अजित गोपछडे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीतील दोघांवर प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली; पण जिल्ह्यातील एकाही आमदाराचा त्यामध्ये समावेश नाही. खा. अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनाही बेदखल करण्यात आले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या जिल्हा प्रभारींची नावे मंगळवारी जाहीर केली. राज्यातील काही आमदार तसेच पक्ष संघटनेतील जबाबदाऱ्यांचा अनुभव असलेल्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार आहेत; पण त्यांच्यातून कोणालाही प्रभारी करण्यात आलेले नाही. माजी आमदार राम पाटील रातोळीकर, गंगाधर यशवंतराव जोशी, डॉ. माधव उच्चेकर, प्रवीण साले आदी संघटनात्मक कामे केलेल्यांनाही प्रदेशाध्यक्षांनी विश्रांती दिली आहे.
ह्या नव्या नियुक्त्यांमध्ये नांदेड महानगर जिल्ह्यासाठी प्रभारी म्हणून माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड उत्तर जिल्ह्यासाठी किरण पाटील यांची, तर नांदेड दक्षिण जिल्ह्यासाठी रेखा कुलकर्णी यांना प्रभारी करण्यात आले आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही प्रभारींच्या नियुक्त्या झाल्या आहेत. परभणी शहरासाठी प्रवीण घुगे, तर या जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी आ. संजय केनेकर यांची नियुक्ती करण्यात आली. नांदेडचे संजय कौडगे यांच्याकडे हिंगोलीची, तर खा. अजित गोपछडे यांच्यावर जालना महानगराची जबाबदारी देण्यात आली आहे. जालना ग्रामीणसाठी खा. रामराव वडकुते यांना प्रभारी करण्यात आले आहे. लातूर शहर व ग्रामीण जिल्ह्यासाठी अनुक्रमे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व मनोज पांगारकर यांना प्रभारी करण्यात आले आहे.
लातूरच्या प्रदेश उपाध्यक्ष अर्चना पाटील चाकूरकर यांना धाराशिव, सुनील राणे यांना बीडचे प्रभारी करण्यात आले आहे. नांदेडचे चैतन्य लक्ष्मीकांत देशमुख यांना संभाजीनगर शहरासाठी तर या जिल्ह्याच्या उत्तर व पश्चिम भागासाठी राहुल लोणीकर आणि प्रीतम मुंडे यांना प्रभारी करण्यात आले आहे.