Nanded Hyderabad Container Bus Collision
किनवट : हैदराबाद येथील चिन्ना जियार स्वामी यांच्या दर्शनासाठी किनवटहून निघालेल्या महिलांच्या खासगी आराम बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर आरमूरजवळ गुरुवारी (दि. १३) सकाळी भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या बसलाला पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत बसमधून खाली उतरलेल्या माधवी किरण किनवटकर आणि सुजाता अशोक नेम्मानीवार या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनीता प्रकाश गुंटापेल्लीवार आणि मनिषा भास्कर नेम्मानीवार या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
किनवट येथील सुमारे ६० महिला भाविक दोन खासगी बसमधून चिन्ना जियार स्वामी यांच्या दर्शनासाठी हैदराबादच्या दिशेने निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान एका बसचा टायर फुटल्याने वाहन राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला थांबविण्यात आले. टायर बदलण्याचे काम सुरू असताना काही महिला वाहनातून खाली उतरल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिली.
कंटेनरच्या धडकेने बसलाला जोरदार हादरा बसला. यावेळी खाली उतरलेल्या दोन महिला बसखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी निझामाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात काही महिलांना किरकोळ दुखापत झाल्याचीही माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.
दरम्यान, दुर्घटनेची वार्ता किनवटमध्ये पोहोचताच शहरावर शोककळा पसरली. दर्शनासाठी आनंदाने निघालेल्या महिलांच्या यात्रेला भीषण अपघाताचे गालबोट लागल्याने किनवटकरांकडून हळहळ व्यक्त होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेने मृत महिलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.