Umri water seller killed
उमरी: अकोला येथून सिकंदराबादकडे जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये उमरीतील एका पाणी विक्रेत्या तरुणाचा किरकोळ कारणावरून उमरीतील दुसऱ्या एका तरुणाने खंजीरने भोसकून खून केल्याची थरारक घटना घडली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील आरमुर येथून ताब्यात घेतले आहे.
उमरी शहरातील रापतवारनगर भागातील आतिश अशोक हैबते (वय 29) हा अकोला ते सिकंदराबाद धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेत पाणी विक्री करण्यासाठी सोमवारी (दि.१०) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास उमरीतून चढला. पाणी विक्रीच्या कारणावरून त्याचा एका तरुणाशी वाद झाला. किरकोळ वादाचे रूपांतर खुनात झाले. रक्तबंबाळ अवस्थेत तो तरूण रेल्वेतच पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. खंजीर भोसकून खून करताना रेल्वे डब्यातील अनेक प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, एका महिलेने आपल्या मोबाईलवर थरारक घटनेचे चिञीकरण केले. प्रवाशी महिलेने आरोपीला पकडा पकडा म्हणून आरडाओरड केली. परंतू कुणीच समोर आले नाही.
घटनेची माहिती निजामाबाद रेल्वे पोलिसांना कळविण्यात आल्यावर रेल्वेतून मृतदेह उतरून घेण्यात आला. ही घटना नांदेड रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने नांदेड रेल्वे पोलीस निरीक्षक वाघमारे यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी पुढील तपास सुरू केला.
संशयित तरुण देखील तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यातून रेल्वेने उमरी शहरात अवैध मार्गाने तांदूळ आणण्याचा व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. जुन्या किरकोळ वादातून खून करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, खरे कारण समजू शकलेले नाही. संशयित आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मनमाड ते सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असून या बाबतीत रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कसलीच उपाय योजना केली जात नाही. रात्रीच्या रेल्वे गाड्यातून चोरीच्या घटना वाढल्या आहेत.