नांदेड

Nanded Accident : ॲम्बुलन्सच्या धडकेत नायगावच्या तरुणाचा मृत्यू

हैदराबाद-नांदेड महामार्गावर कुसुम पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

नायगाव : शहरातील कुसुम पेट्रोल पंपाजवळ हैदराबाद-नांदेड महामार्गावर बुधवारी (दि. १९) दुपारी एकच्या सुमारास भरधाव ॲम्बुलन्सने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गजानन बाबुराव वंगरवाड (वय ३५, रा. नायगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन वंगरवाड हे महामार्गावरून रस्ता ओलांडत असताना नांदेडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ॲम्बुलन्सने त्यांना जोरदार उडवले. ही धडक इतकी भीषण होती की, ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावरील प्रवासी व नागरिकांनी तत्काळ नायगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी गजानन वंगरवाड यांना ॲम्बुलन्स चालकासह उपचारासाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गजानन यांना मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नायगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, हैदराबाद-नांदेड महामार्गावरील वाहनांचा वाढता वेग आणि रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांच्या जिवाला निर्माण होणारा धोका या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास नायगाव पोलीस ठाण्याचे बीट जमादार माधव पवार व त्यांचे सहकारी माधव पुने बोईनवाड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT