Movement of disabled people for various demands
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदारांच्या निवासस्थानासमोर भिक मागो आंदोलन करुन परिसर दणाणून सोडला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सकाळपासूनच चोख बंदोबस्त ठेवला होता.
दिव्यांगासाठी आलेला निधी खर्च होत नाही. लोकप्रतिनिधी आपल्या निधीतील रक्कम खर्च करण्यासंदर्भात उदासिनता दाखवतात, असा आरोप सकल दिव्यांग संघटनेच्यावतीने करण्यात आला. गेल्या आठवड्यात संघटनेच्यावतीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. राजेश पवार यांच्या शिवाजीनगर परिसरातील घरासमोर आंदोलन करण्यात आले. आज (दि.२९) शिवसेनेचे आ. हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर यांच्याघरासमोर भीक मागो आंदोलन करण्यात आले.
खासदार, आमदार दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करत नसल्याचे तसेच अधिवेशनात प्रश्न मांडत नसल्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. आ. बालाजी कल्याणकर यांनी स्वतः निवेदन स्वीकारत अधिवेशनात या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
आ. हेमंत पाटील निवासस्थानी नसल्याने त्यांच्या वडिलांनी दिव्यांग संघटनेच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधले. आपल्या व्यथा मांडल्यानंतर राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी भाग्यनगर पोलिसांनी आमदारद्वयांच्या निवासासमोर मोठा बंदोबस्त ठेवला होता.
पोलीस मुख्यालयातील जलद कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षेसंदर्भात सकाळीच आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या होत्या.