नांदेड

दहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या 'त्या' आईचा अखेर मृत्यू...

नातेवाईक पाहुण्यांनी विवाह सोहळा उरकला आणि मुलीच्या विवाहनंतर आईचा मृत्यू, मन सुन्न करणारी घटना

पुढारी वृत्तसेवा

नरेंद्र येरावार

उमरी : मुलीच्या विवाहाचे कपडे खरेदी करून हळदा गावाकडे परत येत असताना मोटार सायकलचा अपघात होऊन आई गंभीर जखमी झाली होती. हा अपघात 22 मार्च रोजी सायंकाळी घडला होता. आईवर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरूच होते. तेव्हा नातेवाईक, पाहुण्यांनी मुलीचा विवाह 24 मार्च रोजी पार पाडला. दरम्यानच्या काळात आई मृत्यूची झुंज देत होती. अखेर तिचा 2 एप्रिल रोजी पहाटे मृत्यू झाला आणि तीचे कुटुंब पोरखे झाले.

घटनेची माहिती अशी की, मुलगी प्रतीक्षा तिचा विवाह मोठ्या थाटात संपन्न करण्याचे स्वप्न आईने उराशी बाळगले होते. रुक्‍मीनबाई गोरखनाथ पांचाळ या लग्नाची कपडे खरेदी करून हळदा गावाकडे जात असताना 22 मार्च रोजी त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. अपघातात आई गंभीर जखमी झाली. प्रकृती चिंताजनक असल्याने नांदेडच्या डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी तिला संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिच्यावर तेथे उपचार सुरू असताना २ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.

आईच्या अपघातानंतर शेजारी असलेल्या नातेवाईक महिलांनी मुलीला हळद लावली. दुःखाचे सावट घेऊन नातेवाईकांनी 24 मार्च रोजी विवाह सोहळा पार पाडली. विवाहानंतर नववधू प्रतीक्षा व तिच्या पतीने घाटी रुग्णालयात जाऊन आईची भेट घेतली. परंतु अपघातानंतर आई कोमात गेली होती. तिला शुद्धी आलीच नव्हती. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. परंतु त्या उपचाराला ती प्रतिसाद देत नव्हती. अखेर तिचा 2 एप्रिल रोजी पहाटे मृत्यू झाला आणि सर्व सुन्न झाले.

तिच्या पश्चात पती, दोन मुली, बारा वर्षाचा एक मुलगा असा परिवार आहे. शेत जमीन नाही, स्वतःचे राहायला घर नाही, अशा परिस्थितीत भावाच्या घरी ते कुटुंब राहत होते. घरची परिस्थिती हलक्याची असल्याने शासनाकडून त्यांना मदत मिळावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यानच्या काळात गंभीर जखमी झालेल्या रूक्‍मीनबाईला वेळीच उपचार मिळावा यासाठी या भागातील राजकीय नेत्यांनी सहकार्य केले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर त्या जखमी आईचा मृत्यूशी झुंज देताना मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT