MLA Anandrao Bondharkar inspected flood-affected agriculture!
नांदेड : पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांशी नावे जुळलेले नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी आज नांदेड दक्षिण भागातील पूरग्रस्त शेतात जाऊन पाहणी केली. चक्क कमरेइतक्या पाण्यातून वाट काढत शेतकऱ्यांसोबत त्यांनी पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना अधिकचा मावेजा मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वांगी, इंजेगाव, नागापूर, गाडेगाव, पुणेगाव, सिध्दनाथ आदी भागांत पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठावरील आणि सकल भागातील शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरले आहे.
हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकट आणि हिरावून घेतला आहे. या परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि नुकसानग्रस्त पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आ. बोंढारकर हे आज पूरग्रस्त भागातील बांधावर गेले होते.
यावेळी पिकाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत त्यांनी चक्क कमरेइतक्या पाण्यातून जाऊन सोयाबीनसह अन्य पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे. जाहीर झालेल्या निधीपेक्षाही अधिक निधी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी करणार आहोत, असा विश्वासही आ. बोंढारकर यांनी यावेळी दिला.